ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे !

-ना.धों. महानोर

रान हासे अंकुरातुन

रान हासे अंकुरातुन चंद्रलेणे सांडले
अन कुणाचे पाहताना भागलेती डोळुले
लाख प्राणांची रिणाई बोलता ओथंबली
एक भोळी शब्दगाथा आरतीने व्यापली
झेलताना दान ऐसे नम्र झाल्या ओंजळी
मृत्तिकेच्या चंदनाची रेघ भाळी वंदिली

-ना. धों. महानोर

चवळीची शेंग पिवळी धम्मक अशी झळकते

चवळीची शेंग पिवळी धम्मक अशी झळकते
तिपीतिपी ऊन , श्रावणाचे गान कंठात झुलते
पाऊल पाऊल उचलता काच बिंदोली सांडते
उभ्या बंधारयाच्या मनाला काहीसे चाटूनही जाते
सावळ्या मेघांचे आभाळात बन मन वेटाळते
तिला कुठलीशी जुनी आठवण पांघरून जाते
गोबरया गालाची मंजूळ बोलाची अश्शी हरखते
तिच्या निळ्याभोर अश्राप डोळ्यांना पाखरू वेढते !
-ना. धों. महानोर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...